कोलकाता | जन सम्राट न्यूज नेटवर्क
पश्चिम बंगालच्या सत्तेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी निवडणूक चाणक्य अमित शाह यांनी कंबर कसली आहे. यावेळी केवळ रॅली करून न थांबता, त्यांनी थेट १५ दिवस बंगालमध्ये मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला. शाह यांच्या या १५ दिवसांच्या मुक्कामाची अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने हरलेल्या जागांवर फोकस, ममता दीदींच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देणे, थेट बैठका-चर्चा या रणनीतीचा समावेश आहे.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या तोंडावर 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याने राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठी एकदिलाने उभ्या राहणाऱ्या आणि तब्बल ८७ विधानसभा जागा असलेल्या सीमावर्ती चार जिल्ह्यातून २१ लाख नावे वगळण्यात आली आहेत. यात बहुसंख्य मुस्लिम मतदार आहेत. हा फटका कुणाला बसणार, यावरच बंगाल निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.
अमित शाह यांची रणनीती
* हरलेल्या जागांवर फोकस: २०२१ च्या निवडणुकीत ४० हून अधिक जागा अशा होत्या जिथे भाजपचा ५ टक्क्यांहून कमी फरकाने पराभव झाला होता. शाह स्वतः या जागांवर जाऊन कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत.
* ममता दीदींच्या बालेकिल्ल्यात आव्हान: भवानीपूर आणि नंदीग्राम यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी स्वतःच्या हाती घेतली आहे.
* थेट संवाद: रात्रीच्या वेळी बैठका आणि दिवसा रॅली असा त्यांचा झंझावात असून, उत्तर बंगालपासून दक्षिण बंगालपर्यंत भाजपची पकड घट्ट करण्याचा त्यांचा मानस आहे. शाह यांचा हा मुक्काम म्हणजे केवळ प्रचार नसून, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) किल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी रचलेली एक सूक्ष्म रणनीती मानली जात आहे.
९१ लाख मतांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: कोणाचे गणित बिघडणार?
निवडणूक आयोगाने राबवलेल्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) प्रक्रियेत पश्चिम बंगालमधील मतदार यादीतून तब्बल ९० लाख ८३ हजार मतदारांची नावे वगळली आहेत. ही नावे मृत, स्थलांतरित किंवा दुबार मतदार या कारणास्तव काढली गेली असली, तरी यावरून राज्यात मोठा राजकीय वाद पेटला आहे.
या कपातीचा राजकीय परिणाम
* कोणाच्या पथ्यावर? भाजपसाठी हे ‘क्लीनअप’ असून, घुसखोर आणि बनावट मतदारांची नावे गेल्याने मतदानाची टक्केवारी पारदर्शक होईल, असा त्यांचा दावा आहे. विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिथे भाजपला कमी फरकाने फटका बसला होता, तिथे या बदलाचा भाजपला फायदा होऊ शकतो.
* ममता बॅनर्जींचा आरोप: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर तीव्र आक्षेप घेत आरोप केला आहे की, “विशिष्ट समुदायांच्या” मतदारांना लक्ष्य करून त्यांची नावे यादीतून जाणीवपूर्वक हटवण्यात आली आहेत. मुर्शदाबाद, मालदा आणि उत्तर २४ परगणा यांसारख्या मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे कापली गेली असल्याने टीएमसीच्या हक्काच्या व्होट बँकेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सत्तेचा पेच: निर्णायक वळणावर बंगाल
९१ लाख मते वगळली गेल्यामुळे बंगालमधील अनेक मतदारसंघांतील ‘विनिंग मार्जिन’ पूर्णपणे बदलले आहे. एका बाजूला अमित शाह यांची आक्रमक व्यूहरचना आणि दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी यांची ‘भावनिक आणि अस्मितेची’ हाक, अशा कात्रीत बंगालचा मतदार अडकला आहे. ही ९१ लाख मते नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार आणि अमित शाह यांचा १५ दिवसांचा मुक्काम सत्तेत बदल घडवणार का, याचे उत्तर ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणीतच मिळेल.
