पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत संघर्ष चिघळल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षाच्या वाट्याला आलेल्या सात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, त्यामध्ये भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
सचिन काळभोर यांनी शहरातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः निगडी चौकातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण विरोधी कारवाई तसेच विविध नागरी समस्यांवर त्यांनी थेट आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. यामुळेच त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
भोसरी विधानसभा निवडणुकीदरम्यानही काळभोर यांनी आमदार लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे पत्रव्यवहार केल्याचेही समोर आले होते. तसेच काही राजकीय कार्यक्रमांमध्ये ‘दारू-मटण संस्कृती’ला विरोध दर्शवून त्यांनी पक्षातील काही पद्धतींवर टीका केली होती.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौथरा बांधकाम प्रकरणात सुमारे पाच कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप करत काळभोर यांनी महापालिका प्रशासनासह आमदार लांडगे यांच्यावर टीका केली होती. या मुद्द्यावरून दोघांमधील राजकीय दरी आणखी वाढल्याचे बोलले जाते.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी काळभोर इच्छुक असून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या नावाला आमदार लांडगे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपमध्ये गटबाजी उघड झाल्याचे चित्र दिसत आहे.
याशिवाय, चिखली येथील टाऊन हॉल उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या काळभोर यांना आमदार लांडगे यांनी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात काळभोर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, गेल्या महिन्यात सचिन काळभोर यांनी ‘मातोश्री’ येथे भेट दिल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याबाबत प्रतिक्रिया देताना काळभोर यांनी या सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले. “मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असून माझ्याविरोधात राजकीय हेतूने चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत,” असे त्यांनी सांगितले. एकाच पक्षातील दोन नेत्यांमधील उघड मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी काळात स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर या वादाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
