Spread the love

जळगाव  : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर यांनी आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील दालनात त्यांनी कार्यभार हाती घेताच तत्काळ कामकाजाला सुरुवात केली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या अभियान संचालकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तात्काळ ‘ॲक्शन मोड’मध्ये काम सुरू करत प्रशासकीय कार्यपद्धतीत वेग आणण्याचे संकेत दिले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन तसेच जुन्या अशा दोन्ही प्रशासकीय इमारतींमधील सर्व विभागांना भेट देत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला.

प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. कर्मचाऱ्यांच्या टेबलवर जाऊन कामकाजाची माहिती घेत त्यांनी प्रलंबित कामे, अडचणी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी कामकाज अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शनही केले.

जिल्हा परिषद प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर देणार असल्याचे संकेत त्यांच्या पहिल्याच दिवशीच्या कार्यपद्धतीतून दिसून आले. नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे जिल्हा परिषद प्रशासनात चैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version