Spread the love

सह्याद्रीच्या कुशीतल्या छोट्याशा गावाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेतून घडवली परिवर्तनाची नवी गाथा

जावळी : जावळी तालुक्यातील आलेवाडी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, डोंगर-दऱ्यांनी वेढलेले छोटेसे गाव. जेमतेम दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेले हे गाव भौगोलिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असले, तरी वातावरण मात्र कोकणासारखेच—मुसळधार पाऊस, लाल माती आणि भात हेच मुख्य पीक. मात्र विपुल पाऊस पडूनही पाणी साठवणुकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा आणि शेतीसाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत होती.

गाव समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून जात होते. या समस्येची जाणीव गावकऱ्यांना झाल्यानंतर त्यांनी एकत्र येत २०२३ मध्ये “नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था” स्थापन केली. पाणी अडवणे, पाणी साठवणे आणि जमिनीत पाणी मुरवणे यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचा निर्धार करण्यात आला.

या उपक्रमासाठी विविध ठिकाणी पाहणी दौरे करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या नाम फाऊंडेशनकडून सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या सहकार्याने गावात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू लागली.

गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून २०२४ मध्ये एकूण २३ छोटे-मोठे तलाव तयार करण्यात आले, तर ६५० पेक्षा अधिक डीप सीसीटी (CCT) खोदण्यात आले. याचबरोबर जनजागृतीसाठी दररोज रात्री ऑनलाईन बैठका घेण्यात येऊ लागल्या. निधी संकलन आणि श्रमदानासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढाकार घेत मोठा सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे महिलांनी पुढे येत नारीशक्तीची ताकद दाखवून या चळवळीला बळ दिले.

गावातील शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही मोठे योगदान दिले. प्रत्येक रविवारी सुट्टीच्या दिवशी गावातील तसेच बाहेरगावी राहणारे युवक-युवती गावात येऊन श्रमदान करू लागले. इतकेच नव्हे, तर सामाजिक कार्याची आवड असलेल्या शेकडो “पाणीयोद्ध्यांनी” या उपक्रमात सहभाग घेतला. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी तलाव, मातीनालाबांध आणि डीप सीसीटीसाठी उपलब्ध करून दिल्या.

या सर्व कामांचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. गेल्या वर्षी गावातील विविध पाणीस्रोतांमध्ये सुमारे ८ ते ९ फूट पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. यंदा देखील गेल्या ५० दिवसांपासून अविरत काम सुरू असून २७ नवीन तलाव, मातीनालाबांध आणि सुमारे २५० ते ३०० नवीन डीप सीसीटी तयार करण्यात आले आहेत. या सर्वांची एकत्रित लांबी १० किलोमीटरपेक्षा अधिक असून एका पावसाळ्यात १०० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी मुरवण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

यावर्षी पाण्याची पातळी १५ ते २० फूट वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यात संपूर्ण शेती ओलिताखाली आणणे, फळबाग लागवड वाढवणे, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उन्नती यावर भर देण्यात येणार आहे.

“पाणीदार आलेवाडी” हे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण गाव एकजुटीने झटत आहे. या प्रयत्नांतून आलेवाडी केवळ तालुका किंवा जिल्हा नव्हे, तर देशपातळीवर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. खऱ्या अर्थाने, “इतिहास ध्येयवेडेच घडवतात” याची प्रचिती देणारी ही आलेवाडीची जलक्रांती भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version