Spread the love

भव्य कविसंमेलनात ४० कवींचा सहभाग; प्रबोधनपर कवितांमधून सामाजिक संदेश

राजगुरुनगर (प्रतिनिधी):
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त खेड येथे फुले विचारांचा जागर करणारे भव्य कविसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने ११ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी व केंद्रीय गृह मंत्रालयातील भाषा अनुवादक अधिकारी डॉ. संजय बोरुडे उपस्थित होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी श्रीकांत ढेरंगे, तर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून शांताराम (बापू) घुमटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आदर्श शिक्षक जी. रं. शिंदे, विद्या पं. समिती सदस्य शंकरराव कावडे आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी संतोष गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून फुले विचारांचे सामाजिक व साहित्यिक महत्त्व अधोरेखित केले.

मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच परिसरातील सुमारे ४० कवींनी प्रबोधनपर कविता सादर करत सभागृहात विचारांचा प्रभावी जागर घडवून आणला. प्रत्येक कवीच्या सादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व सहभागी कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या वेळी शैलेश गायकवाड, विलास बाबर, अलका भवारी, कमल कळमकर आणि डी. के. वडगांवकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुण्यातील कवी विलास बाबर यांना त्यांच्या सातत्यपूर्ण साहित्यसेवेबद्दल ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले काव्यकस्तुरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या ‘काव्य वर्षाविलास’, ‘वर्षाधारा’ या काव्यसंग्रहांसह ‘विलासचे वैचारिक वैभव’ या ग्रंथाचा विशेष उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन कवी दत्ता सुकाळे, जी. रं. शिंदे आणि प्रा. स्वाती भोसले यांनी केले. कवी गजानन ऊफाडे आणि रुपाली मेदगे यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुकर गिलबिले यांनी आभार मानले. या कविसंमेलनाच्या माध्यमातून फुले विचारांना काव्यरूपातून अभिवादन करण्यात आले असून सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात यश मिळाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version