Spread the love

पाण्यात बुडून सख्ख्या भावांचा हृदयद्रावक अंत

पुणे – राजगड : राजगड तालुक्यातील घेवंडे येथे रविवारी घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळून गेला आहे. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंप बसविताना विजेचा जबर धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेत निव्ही-घेवंडे समूह ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड (वय 50) आणि त्यांचे बंधू दत्तात्रेय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड (वय 55) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे भाऊ घेवंडे गावातील गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शेतीसाठी कृषिपंप बसविण्याचे काम करत होते. दुपारच्या सुमारास मोटार दुरुस्ती सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने दोघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते थेट खोल पाण्यात पडले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस अधिकारी अमित देशमुख, राजेंद्र आवदे, शुभम कव तसेच बचाव पथकातील सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी अंदाजे 6.30 वाजता दामाजी गायकवाड यांचा मृतदेह शोधण्यात आला. मात्र, दत्तात्रेय गायकवाड यांचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडू शकला नाही. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवावी लागली असून सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

या बचावकार्यात हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अध्यक्ष तानाजी भोसले, गणेश सपकाळ (पोलीस पाटील), उत्तम पिसाळ, विक्रम बिरामने, संदीप सोलस्कर, संजय चोरघे, साजाधव आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. दामाजी गायकवाड हे माजी सरपंच म्हणून परिसरात परिचित आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अकाली निधनाने घेवंडे गावासह संपूर्ण राजगड तालुक्यावर शोककळा पसरली असून दोन्ही भावांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version