Spread the love

प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिसांपुढे हजर

2.40 कोटींच्या व्यवहारांची चौकशी

शिर्डी:- अशोक खरात संबंधित समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहार प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणातील धागेदोरे उलगडण्यासाठी प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्या आहेत. तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांच्या व्यवहारांबाबत त्यांच्याकडून सविस्तर हिशोब घेतला जाणार आहे. प्रतिभा चाकणकर या माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी असून, अशोक खरात प्रकरणात त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने वापरलेल्या काही बँक खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलांच्या खात्यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिर्डी पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच त्यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार त्या चौकशीसाठी हजर झाल्या. त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या चार बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. या व्यवहारांचा स्रोत आणि स्वरूप याचा आता सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याच्याशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. समता पतसंस्थेतील 100 खात्यांवर तो नॉमिनी असल्याचे समोर आले असून, सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतील 32 खात्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे आढळले आहे. या सर्व खात्यांद्वारे 60 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 33 खातेदारांची चौकशी पूर्ण झाली असून, अनेकांनी आपल्या नावावर खाते असल्याची माहितीच नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण मोठ्या आर्थिक गैरव्यवहारासह मनी लॉन्ड्रिंगकडेही निर्देश करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक खरातशी कथित संबंधांमुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यांच्या पक्षीय जबाबदाऱ्यांवरही परिणाम झाला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून त्यांनाही समन्स बजावण्यात आल्याची चर्चा असून, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. सद्यस्थितीत, प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीतून कोणते नवे खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version