Spread the love

आत्मसिद्ध मिशन व विश्व मराठी परिवाराचा उपक्रम; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साही आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात देश-विदेशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

हॉटेल ग्रीन सिग्नल, नीलमल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता आणि सर्जनशील क्षेत्रातील योगदानाची दखल घेत अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वनराई संस्थेचे संस्थापक Ravindra Dharia यांच्या वतीने संस्थेचे सचिव अमितजी, कविराज विजयराव सातपुते, लेखक-पत्रकार-गीतकार श्रीपाद कुलकर्णी, व्यंगचित्रकार नीरज सबनीस तसेच उदयोन्मुख नेतृत्व पूजा प्रतुल जागडे यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती कटके होते. त्यांच्या मार्गदर्शक आणि विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांना नवी दिशा दिली. प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश नेऊरगावकर हे आपल्या सौभाग्यवतींसह उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिक उंचावली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन तपेंद्र, गजानन, समता आणि सोनाली यांनी केले. संपूर्ण सोहळ्यात शिस्तबद्ध मांडणी, आकर्षक सादरीकरण आणि प्रसन्न वातावरण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. चारुता आपटे यांच्या सुमधुर गायनाने सभागृहात भावपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण झाले. आत्मसिद्ध मिशनचे प्रमुख राजेशजी यांनी आपल्या प्रभावी संवादातून आत्मविकास, सकारात्मकता आणि प्रेरणेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या करिष्माई शैलीमुळे कार्यक्रमात विशेष ऊर्जा निर्माण झाली.

या सोहळ्यास प्रा. संजय पवार, सुमंगला बाकरे, सनील गाडेकर, माही मस्के, तहेसीन चिंचोलीकर, आकाश मोरे, प्रा. डॉ. प्रियांका जोशी, खाद्यसंस्कृती तज्ज्ञ मानसी भोसले, सुयोग कुलकर्णी, प्रा. लहू काळे, माधुरी ओरसे, कोमल जाधव, नम्रता, पौर्णिमा यादव, समाजकल्याण अधिकारी शिरसाट साहेब, राष्ट्रीय पिस्तूल चॅम्पियन प्रथमेश गायकवाड, सिनेअभिनेत्री नंदिनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी गुरु वाय. पी. बाबा यांच्या प्रेरणेतून साकारला जाणारा हा पुरस्कार सोहळा प्रेरणा, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा उत्सव ठरला. पुण्यातील या कार्यक्रमाने उपस्थितांना ऊर्जा, आनंद आणि प्रेरणेचा अविस्मरणीय अनुभव दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version