Spread the love

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त अंध शाळेत प्रभावी ‘आम्ही भारताचे लोक’ सत्र; विद्यार्थ्यांना संविधान मूल्यांची जाणीव

पुणे | एस.एन. नांदेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोरेगाव येथील द पुन्हा स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड बॉईज या अंध शाळेत सामाजिक समता सप्ताह आणि संविधान जागर व्याख्यानमालेअंतर्गत कवी, लेखक व दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांचे “आम्ही भारताचे लोक” हे प्रेरणादायी सत्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूलभूत मूल्यांची जाणीव करून देत समतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.

या प्रसंगी बोलताना हृदयमानव अशोक यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, संविधान हे केवळ कायद्यांचे संहितापुस्तक नसून ते मानवी मूल्यांचे भक्कम सुरक्षा कवच आहे. “समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात रुजली, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

संविधान प्रस्ताविकेतील तत्त्वे केवळ पाठांतरापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या विचारांमध्ये आणि आचरणात कशी उतरवावीत, समाजातील जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “आम्ही भारताचे लोक” या संकल्पनेचा खरा अर्थ उलगडताना त्यांनी प्रत्येक नागरिकाची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या सोप्या, रंजक आणि प्रभावी शैलीमुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सत्राला सुरुवात झाली आणि शेवटी संविधान प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी अमृत लोखंडे, मुख्याध्यापक दामोदर सरगम, शिक्षक ज्ञानेश पाटील, रंगनाथ गजरे, रामेश्वर खिळे, सुदाम दळवी यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ गजरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी मांडले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, समतेच्या विचारांची बीजे रुजवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य ठरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version