महावितरणाच्या निष्काळजीपणाचा आरोप; पंचनामा करून तातडीने भरपाईची मागणी
धरणगाव (भवरखेडे) : धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याचे उभे मका पीक जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत शेतकरी विनायक पुना ब्राह्मणे यांचे सुमारे एक एकर क्षेत्रावरील मका पीक तसेच ठिबक सिंचनाची संपूर्ण यंत्रणा भस्मसात झाली असून, या घटनेत एक लाखांहून अधिकचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर शेतकरी विनायक ब्राह्मणे यांनी जळालेल्या पिकाकडे पाहत ढसाढसा रडत आपली व्यथा व्यक्त केली. पाच महिन्यांच्या कष्टानंतर उभे केलेले पीक काही क्षणांत जळून खाक झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात वीजपुरवठा सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाले. विजेच्या तारा खाली झुकलेल्या अवस्थेत असल्याने ठिणग्या पडून मका पिकाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण शेत जाळून टाकले. यामध्ये ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि पाईपलाईनदेखील पूर्णपणे जळून नष्ट झाल्या.
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. शेतातील विजेच्या तारा योग्य उंचीवर नसल्याने आणि देखभाल न झाल्यानेच शॉर्टसर्किट होऊन ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
शेतकरी विनायक ब्राह्मणे यांनी प्रशासनाकडे निवेदन देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच शेतातील खाली आलेले विजेचे तारे तात्काळ दुरुस्त करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशीही त्यांनी विनंती केली आहे. या घटनेमुळे आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता वीज यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
