Spread the love

दोन दिवसांपासून पाणी बंद; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलनाचा इशारा

एरंडोल : तालुक्यातील कढोली येथील रिंगणगावमध्ये पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणीटंचाईमुळे महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. अनेक ग्रामस्थ विहिरींवर अवलंबून असून त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

ग्रामस्थांच्या मते, पाईपलाईनची योग्य देखभाल न केल्यामुळेच ही समस्या वारंवार उद्भवत आहे. संबंधित यंत्रणेकडून वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायत कारभार ठप्प
रिंगणगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर अद्याप प्रशासक नियुक्त करण्यात आलेला नाही. तसेच ग्रामसेवकही वारंवार रजेवर असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे ठप्प झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच समस्या अधिक तीव्र झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दूरवरून पाणीपुरवठा; अडचणी कायम
गावाला पेयजल योजनेअंतर्गत दापोरी येथील गिरणा नदीकाठावरून, सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने पुरवठा खंडित होतो आणि ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.

आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तात्काळ पाईपलाईनची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा एरंडोल पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

“दापोरी येथून येणारी पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सरपंच व ग्रामसेवक नसल्यामुळे अडचण अधिक वाढली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.”
— भरत महाजन, ग्रामस्थ, रिंगणगाव

Share.
Leave A Reply

Exit mobile version