Spread the love

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दहशत माजवण्याचा कट उधळला, शस्त्रासह ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न उधळून लावत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलसह सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही समाजकंटकांकडून बेकायदेशीर शस्त्रांचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे उमटी गावाकडून कृष्णापूरमार्गे चोपड्याकडे जाणाऱ्या दोन संशयित इसमांवर पोलिसांनी पाळत ठेवली होती. त्यानंतर संशयित मोटारसायकल (हिरोहोंडा, क्र. MH-19-9-9450) अडवून दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमटी, ता. चोपडा, जि. जळगाव) आणि गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी आहेत.

पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ नोंदवून शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार विष्णू बिन्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्रधारकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा कारवायांवर आणखी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version