Spread the love

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचा निर्णय

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात आली असून, प्रशासन अधिक सक्षम करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशानुसार, जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी धुळेचे विद्यमान एसपी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली सांगली येथे करण्यात आली असून, त्यांच्या जागी पुण्यातील पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची सातारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे विद्यमान एसपी संदीप घुगे यांना मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) म्हणून नेमण्यात आले आहे.

तसेच, कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना तात्पुरत्या स्वरूपात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे एसपी निलोत्पल यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली असून, गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक एम. सेरा यांना पदोन्नती देत एसपीपदी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय, पुण्यातील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांना वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली देण्यात आली आहे.

या सर्व बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version