Spread the love

चोपड्यातील खून प्रकरणाचा वेगवान उलगडा; चालत्या रेल्वेतून दोघांना ताब्यात

जळगाव : चोपडा शहरातील खून प्रकरणात पोलिसांनी अतिशय वेगाने कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे या गुन्ह्याचा जलद उलगडा झाला. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ ते २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० दरम्यान चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारी परिसरात प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून खून करण्यात आला होता. पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यातील आरोपी विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) हे गुन्हा केल्यानंतर फरार झाले होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मुंबईकडे पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी रेल्वेने परत जळगावकडे निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून रेल्वेत बसून शोधमोहीम राबवली. नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेतच दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यांनी पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात यश आले. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version