४२°C पार तापमान; आरोग्य विभाग सतर्क, नागरिकांसाठी तातडीच्या उपचारांची व्यवस्था
नशिराबाद : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तापमानाने ४० ते ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (आयुष्मान आरोग्य मंदिर) विशेष ‘उष्माघात कक्ष’ (Heat Stroke Ward) सुरू करण्यात आला आहे.
तातडीच्या उपचारांसाठी सज्ज यंत्रणा
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उष्माघातग्रस्त रुग्णांना तत्काळ आणि प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रुग्णांना आराम मिळावा यासाठी थंड वातावरणाची विशेष व्यवस्था
ओआरएस द्रावणासह आवश्यक औषधांचा पुरेसा साठा
प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची २४ तास सेवा
स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा
डॉक्टरांचे नागरिकांना आवाहन
वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव आणि डॉ. अजयपाल सिंग यांनी नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, तसेच डोक्याचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चक्कर येणे, मळमळ, तीव्र डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास विलंब न करता तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नशिराबाद परिसरात सुरू करण्यात आलेल्या ‘उष्माघात कक्षामुळे’ उन्हाळ्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
