Spread the love

२५.५० लाखांची वाहने जप्त; ४३ हजारांची वाळू हस्तगत, जिल्हाभरात एकाच वेळी मोहीम

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जिल्हा पोलीस दलाने मोठी संयुक्त कारवाई करत या बेकायदेशीर धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आली.

या धडक कारवाईदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारी एकूण ४ वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये ट्रॅक्टर आणि डंपरचा समावेश असून जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे २५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. तसेच या वाहनांमधून सुमारे ४३ हजार रुपयांची अवैध वाळूही हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई भडगाव, चोपडा ग्रामीण, चाळीसगाव ग्रामीण आणि यावल या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली. संबंधित वाहनचालकांविरोधात बी.एन.एस. २०२३ च्या कलम ३०३(२) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३०(१) व १७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान पोलीस अधिकारी कविता नेरकर आणि संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी प्रभावीपणे कामगिरी बजावली.

कारवाई सुरूच राहणार
जिल्ह्यातील खनिज संपत्तीची चोरी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version