Spread the love

१५ महानगरपालिका, ८४ नगरपालिका व २००+ पंचायतांमध्ये प्रक्रिया; मतमोजणी २८ एप्रिलला

अहमदाबाद : गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रविवारी उत्साहात मतदान पार पडले. राज्यातील १५ महानगरपालिका, ८४ नगरपालिका तसेच २०० हून अधिक जिल्हा व तालुका पंचायतांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणुकांकडे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

भक्कम सुरक्षा व्यवस्था
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी गुजरात राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यभरातील सुमारे ४८ हजार मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पोलिसांसह सुरक्षा दलांच्या उपस्थितीत मतदान केंद्रांवर काटेकोर नियोजन करण्यात आले होते.

उष्णतेचा परिणाम, संध्याकाळी वाढले मतदान
दिवसाच्या सुरुवातीला कडाक्याच्या उन्हामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावलेला दिसून आला. मात्र, दुपारनंतर आणि विशेषतः सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांचा प्रतिसाद वाढला आणि मतदानाचा टक्का हळूहळू उंचावला.

मतमोजणी २८ एप्रिलला
या निवडणुकांची मतमोजणी २८ एप्रिल रोजी करण्यात येणार असून निकालांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आगामी राजकीय समीकरणांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version