प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधीत भव्य शिबिर; ५५ पेक्षा अधिक बाटल्या रक्तसंकलन
पाळधी / जळगाव : वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणांना सामाजिक कार्याशी जोडणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असून रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे मानवतेची भावना अधिक दृढ होते, असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ५५ पेक्षा अधिक बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडलेल्या या शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. युवक, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करत सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडवले.
रक्तदात्यांचा सन्मान
या वेळी प्रतापराव पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना पाण्याचे जार व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. “रक्तदान हेच खरे जीवनदान आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी दाखवलेले प्रेम अमूल्य आहे,” अशी भावना प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केली.
संघटनांचा मोलाचा सहभाग
या शिबिरासाठी प्रतापराव पाटील मित्र परिवार, विक्की बाबा युवा मंच, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, GPS मित्र परिवार, युवासेना जळगाव ग्रामीण तसेच शिवसेना जळगाव ग्रामीण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन बीएम ग्रुप, पाळधी यांच्या वतीने करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला शिवसेनेचे एरंडोल व अमळनेर जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जळगाव शहर व ग्रामीण जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर मनोज चौधरी, उद्योगपती शरद कासट व गोपाल कासट, नगरसेवक कुंदन काळे, ॲड. बबन पोकळे, माजी सभापती सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, युवासेनेचे दीपक भदाणे, सरपंच विजय पाटील व गोपाल पाटील, तसेच धरणगावचे पोलीस निरीक्षक पवार, एपीआय भूषण काटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय १०० पेक्षा अधिक वेळा रक्तदान केलेले रक्तदाते मुकुंद गोसावी यांची विशेष उपस्थिती उल्लेखनीय ठरली. जळगाव मतदारसंघातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते भूषण महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन जीपीएस ग्रुपचे प्रशांत झंवर यांनी मानले.
समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम
या रक्तदान शिबिरामुळे समाजात सेवा, सहकार्य आणि मानवतेचा संदेश अधिक बळकट झाला असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
