Spread the love

केनियाच्या सबॅस्टियन सावेने दोन तासांचा टप्पा ओलांडून रचला नवा जागतिक विक्रम

लंडन : क्रीडा विश्वात रविवारी एका ऐतिहासिक अध्यायाची नोंद झाली. केनियाच्या सबॅस्टियन सावे याने लंडन मॅरेथॉनमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत ‘दोन तासांच्या आत मॅरेथॉन’ पूर्ण करण्याचे मानवी स्वप्न साकार केले आहे. सावेने ही शर्यत अवघ्या १ तास ५९ मिनिटे आणि ३० सेकंदात पूर्ण करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

अधिकृत स्पर्धात्मक शर्यतीत दोन तासांपेक्षा कमी वेळात ४२.२ किलोमीटरचे अंतर पार करणारा सावे हा जगातील पहिला धावपटू ठरला आहे. त्याने केनियाच्याच दिवंगत केल्विन किप्टम यांचा २ तास ०० मिनिटे ३५ सेकंदांचा जागतिक विक्रम मोडीत काढला. सावेने १:५९:३० अशी वेळ नोंदवून जुन्या विक्रमात १ मिनिट ५ सेकंदांची मोठी कपात केली.

लंडन मॅरेथॉन ही शर्यत अत्यंत चुरशीची ठरली. इथियोपियाच्या योमिफ केजेल्चा यानेही १:५९:४१ वेळेसह दोन तासांचा टप्पा ओलांडला आणि दुसरे स्थान पटकावले. युगांडाच्या जेकब किप्लिमोने २:००:२८ वेळेसह तिसरे स्थान मिळवले. विशेष म्हणजे, पहिल्या तिन्ही धावपटूंनी जुन्या जागतिक विक्रमापेक्षा कमी वेळ नोंदवली.

महिला गटात इथियोपियाची तिग्स्त असेफा विजेती

महिलांच्या शर्यतीत इथियोपियाच्या तिग्स्त असेफाने २:१५:४१ वेळेसह आपले जेतेपद राखले आणि ‘ओन्ली वुमेन’ मॅरेथॉनचा नवा जागतिक विक्रम नोंदवला. (दैनिक ‘गांवकरी’ वृत्त सेवा)

विजयानंतर बोलताना ३१ वर्षीय सावे म्हणाला, “आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. शर्यतीच्या सुरुवातीपासूनच आम्ही चांगल्या लयीत होतो. शेवटच्या टप्प्यात मला अधिक ताकद जाणवत होती आणि फिनिशिंग लाईनवर वेळ पाहिल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. हा केवळ माझा विजय नसून संपूर्ण क्रीडा विश्वासाठी एक मोठा क्षण आहे.” या ऐतिहासिक कामगिरीमुळे लंडन मॅरेथॉनच्या इतिहासात २०२६ सालच्या शर्यतीची नोंद सुवर्णअक्षरांनी केली जाईल. जागतिक ॲथलेटिक्सच्या मान्यतेनंतर या विक्रमावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.

Share.
Leave A Reply

Exit mobile version