Spread the love

मुरादाबादमधील श्रीराम सोसायटीतील फलकांमुळे सोशल मीडियावर मतभेद; प्रशासन सतर्क

लखनौ : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात लाजपत नगर भागातील एका सोसायटीमध्ये घराबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे सध्या सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले असून हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. मुरादाबादमधील श्रीराम सोसायटीमधील घरांबाहेर ‘हिंदू सनातनी सोसायटी’चे फलक लागले आहेत. हे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लाजपत नगरमधील श्रीराम सोसायटीमध्ये अनेक घरांच्या बाहेर पिवळ्या रंगाचे फलक पाहायला मिळत आहेत. या फलकांवर ठळक अक्षरात ‘हिंदू सनातनी सोसायटी – श्रीराम सोसायटी’ असे लिहिलेले आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीमधील रहिवाशांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर चर्चा आणि वाद

हे पोस्टर्स व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काही युजर्स याला धार्मिक ओळखीचे समर्थन मानत आहेत, तर काही जण यामुळे समाजात भेदभावाची भावना निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत आहेत. मुरादाबादमध्ये याआधीही मालमत्ता खरेदी-विक्रीच्या वादातून अशा प्रकारचे फलक लावल्याच्या घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे या घटनेकडेही प्रशासन गांभीर्याने पाहत आहे.

प्रशासकीय भूमिका

या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. संबंधित पोस्टर्स कोणत्या उद्देशाने लावले आहेत आणि यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही ना, याची चाचपणी केली जात आहे. अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पोलीस कारवाई झाल्याचे वृत्त नाही. सोसायटीमधील रहिवाशांच्या या भूमिकेमुळे परिसरात शांतता असली तरी सोशल मीडियावर मात्र यावरून मोठी चर्चा रंगली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version