१८ प्रवासी जखमी ; चालकाची प्रकृती गंभीर
एरंडोल (गुरू शिंदे) : एरंडोलपासून काही अंतरावरील भालगाव फाटा परिसरात आज सकाळी धुळेहून भुसावळकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बसवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या डिव्हायडरवर जोरात आदळली. या अपघातात एकूण १८ जण जखमी झाले असून काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातग्रस्त बस क्रमांक एमएच २० बीएल ३४१२ मध्ये १५ प्रवासी, १ चालक, १ वाहक तसेच राज्य परिवहन महामंडळाचा १ कर्मचारी प्रवास करत होता. धडक इतकी जोरदार होती की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भालगाव फाटा परिसरातील सुरू असलेले रस्त्याचे काम, डिव्हायडरची रचना तसेच एसटी चालकांवरील वाढता कामाचा ताण या बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
