पेट्रोल पंपाजवळील धोकादायक स्थिती; नागरिकांची तात्काळ दुरुस्तीची मागणी
जळगाव : जळगाव शहरातील कानडदा रोडवर, सुरेश कलेक्शनकडे जाणाऱ्या मार्गावर पेट्रोल पंपाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या या खड्ड्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका
या भागात जवळच लॉन्स असल्यामुळे विवाह समारंभ व इतर मोठे कार्यक्रम नियमितपणे होत असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत वाहनचालक खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात समोरासमोर येत असून अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वेळा येथे वाहतूक कोंडीही निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
स्थानिक नागरिकांनी या खड्ड्याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित जळगाव महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तात्काळ दुरुस्तीची मागणी
हा खड्डा किरकोळ स्वरूपाचा असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
