Spread the love

ठेकेदार व अधिकाऱ्यांविरोधात संताप; वारंवार अपघातांमुळे प्रशासनावर ताशेरे

जळगाव : जळगाव शहरातील कानळदा रोडवर समर्थ लॉन परिसरात रस्त्यावर मोठी भेग पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भेगेमुळे वारंवार अपघात होत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराविरोधात थेट रस्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला.

स्थानिकांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या मध्यभागी पडलेली ही भेग दिवसेंदिवस अधिकच मोठी होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही भेग दिसून न आल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. अनेक दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागला असून, काही जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे तात्काळ दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लहानशी दुरुस्ती वेळेत केली असती, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक आमदार राजूमामा भोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाने केवळ आश्वासन न देता ठोस कृती करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. सध्या तरी या भेगेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, प्रशासन कितपत वेगाने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version