अन्यथा महागात पडणार; पोलिसांकडून मोठी कारवाई, ; २४x७ सीसीटीव्ही नजरेतून कारवाई
द्रुतगती मार्गावर वाहन थांबवणे धोकादायक
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या ( मिसिंग लिंक ) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
सेल्फी, फोटो काढण्यासाठी थांबू नका…
1 मे महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंक अर्थात ‘मिसिंग लिंक’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. तसेच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी 100 किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे 24×7 सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
खोपोलीहून कुसगावला जोडतो ‘मिसिंग लिंक’
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मुंबईच्या बाजूकडील खोपोलीला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील कुसगावला जोडतो. यामुळे द्रुतगती मार्ग पूर्णपणे प्रवेश नियंत्रित होईल आणि घाटावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
सहा हजार 700 कोटींचा खर्च
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सहा हजार 700 कोटी खर्च करून विकसित केलेल्या या प्रकल्पात दोन बोगदे, दोन पूल आणि टायगर व्हॅलीवरील एका केबल-स्टेड पुलाचा समावेश आहे. यामुळे तीव्र उतार असलेल्या आणि अपघातप्रवण खंडाळा किंवा भोर घाट भागाला वळसा घालून एक नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे, जिथे विशेषतः शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये अनेकदा वाहतूक कोंडी होते.
सहा किलोमीटर अंतर कमी
‘हा प्रकल्प 19.16 किलोमीटर लांबीच्या आधुनिक कॉरिडॉरचा एक भाग आहे’, असे एम.एस.आर.डी.सी.ने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल’.
