Spread the love

पुरस्कार, पुस्तक प्रकाशनाने साहित्यिक मेळावा उजळला

साहित्य, नाट्य आणि संस्कृतीचा संगम; राज्यभरातील साहित्यिक-कलावंतांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे  : तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा १ मे २०२६ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ येथे उत्साहात पार पडला. विविध साहित्यिक, कवी, नाट्यकलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साहित्यिक मेळाव्याचा अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाला सुभाष सोनवणे, जयंत भिडे, सुजित दातार आणि निलेश दातार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच योगेश सुपेकर, अशोक रास्ते, ज्ञानेश्वर कोटगिरे, ॲड. प्रतिभा पोतदार, प्रशांत डोंगरे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संमेलनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना तितिक्षा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पर्यावरण संवर्धन, समाजसेवा, साहित्य आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर कोटगिरे यांना ‘तितिक्षा कानन संवर्धन पुरस्कार’, तर प्रशांत डोंगरे यांना ‘पर्यावरण संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

याचबरोबर ‘तितिक्षा ग्रंथ पुरस्कार २०२६’ अंतर्गत विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट पुस्तकांचा गौरव करण्यात आला. प्रा. जयंत खेडकर यांच्या ‘चला गणित शिकूया’ या ग्रंथमालेला सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. आत्मचरित्र, चरित्र, कादंबरी, कथासंग्रह, बालसाहित्य आणि कवितासंग्रह अशा विविध विभागांत अनेक साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ‘श्रीराम गाथा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे तसेच ‘डहाळी’ या अनियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. विविध काव्य आणि साहित्य स्पर्धांतील विजेत्यांचाही गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी, विजय सातपुते आणि प्रिया दामले यांनी केले, तर आयोजनात अजिता मुळीक, भालचंद्र शिर्के आणि तितिक्षा परिवाराचे मोलाचे योगदान राहिले. या संमेलनामुळे साहित्य, कला आणि संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळाला असून, उपस्थित साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version