लाखो कोंबड्यांच्या कत्तलीला सुरुवात, प्रशासन युद्धपातळीवर; शेतकरी हतबल
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात ‘बर्ड फ्लू’ (एव्हियन इन्फ्लूएंझा)चा उद्रेक झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘पोल्ट्री हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात काही दिवसांतच शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली असून प्रशासनाने तातडीने “कलिंग ऑपरेशन” सुरू केले आहे.
भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या (NIHSAD) अहवालात बर्ड फ्ल्यूची पुष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. बाधित परिसराच्या एक किलोमीटर परिघातील सर्व पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या कत्तलीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, लाखो कोंबड्यांचा नायनाट केला जात आहे.
शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त
महिनोनमहिने मेहनत घेऊन वाढवलेल्या कोंबड्या काही तासांत नष्ट होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक हतबल झाले आहेत. “डोळ्यांदेखत सर्व काही संपताना पाहतोय,” अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने आर्थिक संकटाचे मोठे सावट निर्माण झाले आहे.
कडक उपाययोजना आणि निर्जंतुकीकरण
प्रशासनाने बाधित भागात मोठ्या प्रमाणावर निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली आहे. PPE किट परिधान केलेले कर्मचारी कोंबड्यांचे संकलन करून त्यांची सुरक्षित विल्हेवाट लावत आहेत. पोलिस बंदोबस्तात संपूर्ण प्रक्रिया पार पडत असून, संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर खबरदारी घेतली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
कलिंग प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच, कोणतीही माहिती लपवणाऱ्या पोल्ट्री चालकांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बाजारपेठेवर परिणाम, नागरिकांमध्ये भीती
या उद्रेकामुळे चिकन व अंड्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने पोल्ट्री उत्पादनांकडे ग्राहकांचा ओढा कमी झाला आहे. काही ठिकाणी विक्रीत मोठी घट नोंदवली जात आहे.
उद्योगावर मोठे संकट
नवापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. मात्र वारंवार होणाऱ्या बर्ड फ्ल्यूच्या संकटामुळे हा उद्योग कोलमडण्याच्या मार्गावर आहे. प्रशासन संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना, शेतकरी मात्र आर्थिक अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत. नवापूरमधील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.
