२.१८ लाख मताधिक्याने दणदणीत यश; देशातील सर्वाधिक मताधिक्याचा दावा
बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी विक्रमी कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल २ लाख १८ हजार ९३० मताधिक्याने त्यांनी विजय मिळवत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम आपल्या नावावर केल्याचा दावा करण्यात येत आहे. या विजयासह त्यांनी २०१९ मधील माजी आमदार अजित पवार यांच्या मताधिक्याचाही विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या विरोधातील उमेदवारांना हजाराच्याही आत मते मिळाल्याचे चित्र समोर आले असून हा विजय अधिकच लक्षवेधी ठरला आहे.
देशपातळीवरील विक्रमाचा दावा
यापूर्वी सुनील कुमार शर्मा यांनी २०२२ मध्ये २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, सुनेत्रा पवारांनी तो विक्रम मागे टाकल्याचे सांगितले जात आहे.
पार्थ पवारांचा संयमाचा संदेश
विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. “आजचा दिवस आनंदाचा असला तरी जल्लोष टाळावा. आचारसंहिता संपल्यानंतर जनतेसाठी ‘जनता दरबार’ आयोजित करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात”
विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानत हा विजय “आदरणीय दादांच्या स्मृतींना समर्पित” असल्याचे म्हटले. “हा शेवट नसून नव्या बारामतीच्या विकासाचा प्रारंभ आहे,” असे सांगत त्यांनी विकासाचा ठाम विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर, कार्यकर्त्यांनी मिरवणुका, गुलाल उधळणे टाळून संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बारामतीकरांचा स्पष्ट कौल
या निकालातून बारामतीकरांनी मोठ्या विश्वासाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पोटनिवडणुकीतील हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता राज्य आणि देशाच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरला आहे.
