Spread the love

विधानसभा पराभवानंतर निर्णय; विजय यांच्या नेतृत्वाखाली तामिळगा वेत्री कळघम सर्वात मोठा पक्ष

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)चे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.

राजभवनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा पत्र औपचारिकरित्या राज्यपालांच्या कार्यालयात पाठवण्यात आले असून, त्यावर अंतिम निर्णय व अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे राजकीय स्थित्यंतर घडले आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला केवळ ५९ जागांवर समाधान मानावे लागले, जे त्यांच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे.

दुसरीकडे, अभिनेते-राजकारणी विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने २३४ सदस्यीय विधानसभेत १०७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा टीव्हीके केवळ १० जागांनी कमी आहे.

या निकालामुळे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेबाबत विविध राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. संभाव्य आघाड्या, अपक्षांचा पाठिंबा किंवा इतर राजकीय पर्यायांवर सध्या विचारमंथन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्टॅलिन यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात तामिळनाडूच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version