रिंगणगावात पहाटेच महसूलचा सर्जिकल स्ट्राइक; हायवा ट्रक रंगेहात जप्त
एरंडोल (जि. जळगाव ) । करण शिंदे (गुरु)
एरंडोल तालुक्यातील अवैध वाळू माफियांच्या मक्तेदारीवर अखेर महसूल प्रशासनाने थेट प्रहार केला आहे. दि. ५ मे २०२६ रोजी भल्या पहाटे रिंगणगाव शिवारात तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक रंगेहात पकडण्यात आला. या कारवाईमुळे वाळू माफियांच्या जाळ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रिंगणगाव परिसरातून गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करून ती रात्रीच्या अंधारात वाहतूक केली जात होती. या बेकायदेशीर कारवायांमुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह बिघडत असून नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम, भूजल पातळी घटणे आणि पर्यावरणाचा समतोल ढासळणे अशा गंभीर परिणामांना या माफियांची बेधडक कृत्ये कारणीभूत ठरत आहेत.
पथकाने सापळा रचून हायवा अडवला असता चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना आढळून आला नाही. तत्काळ वाहन जप्त करून एरंडोल तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या धडक कारवाईत नायब तहसीलदार संजय घुले, मंडळ अधिकारी भरत पारधी, ग्राम महसूल अधिकारी वैभव पाठे, श्रीकांत कासुंदे, वीरेंद्र पालवे, संदीप पाटील, रविराज पाटील, पार्थ यादव आणि मयुर कुळकर्णी यांचा समावेश होता.
प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही. गिरणा नदीची लूट थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यासाठी अशा धडक मोहिमा यापुढेही सातत्याने राबवण्यात येणार आहेत.
ही कारवाई केवळ एक ट्रक जप्त करण्यापुरती मर्यादित नसून, वाळू माफियांना थेट दिलेला इशारा मानला जात आहे. महसूल प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता स्थानिक पातळीवर दिलासा व्यक्त केला जात असून, पुढील काळात आणखी कठोर कारवायांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
