Spread the love

जलजीवन मिशन अंतर्गत कांताई बंधाऱ्यावर दोन बोरवेल; ग्रामस्थांकडून ना. गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांचे आभार

पोखरी तांडा । नवल पारधी

पोखरी गावाच्या अनेक वर्षांपासूनच्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर दिलासादायक उपाययोजना करण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कांताई बंधारा परिसरात दोन नवीन बोरवेल करण्यात आले असून, दोन्ही ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कामासाठी मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यसम्राट प्रतापराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून ही योजना प्रत्यक्षात साकारण्यात आली. अनेक दिवसांपासून गावातील महिलांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत होती. ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या एका हंड्यासाठी होणारी ही धावपळ ग्रामस्थांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती.

कांताई बंधाऱ्यावर यशस्वी बोरवेल

जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या या कामात कांताई बंधारा परिसरात दोन ठिकाणी बोरवेल खोदण्यात आले. विशेष म्हणजे, दोन्ही बोरवेलला चांगल्या प्रमाणात पाणी लागल्याने गावाच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याची आशा व्यक्त होत आहे.

“हर घर जल, हर घर नल” या संकल्पनेनुसार आता पोखरी गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून महिलांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामस्थांकडून आभार व्यक्त

या कामाबद्दल युवा सेना मागासवर्गीय तालुकाप्रमुख नवल पारधी तसेच ग्रामस्थांच्या वतीने ना. गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटील यांचे आभार मानण्यात आले.

ग्रामस्थांनी सांगितले की, “गावाच्या पाणीप्रश्नासाठी अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. अखेर लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून आता गावाला कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे.”

पोखरी गावातील या कामामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना कशा राबवता येतात, याचे एक सकारात्मक उदाहरण निर्माण झाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version