Spread the love

कर्जतमध्ये ४२.६°C तर कल्याण-डोंबिवलीत ४१°C पार; हवामान तज्ज्ञांचा ‘हीटवेव्ह’चा इशारा

कल्याण  (संदीप शेंडगे) : मे महिन्याच्या सुरुवातीलाच कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकण पट्ट्यात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला आहे. अनेक शहरांतील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत कोकण भागात ‘हीटवेव्ह’ अर्थात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली असून येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे समुद्राकडून येणारे दमट वारे आणि वाढती आर्द्रता यामुळे प्रत्यक्ष जाणवणारे तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत जाणवू शकते, असा इशाराही मोडक यांनी दिला आहे.

कर्जत आणि नेरळमध्ये उच्चांक
आज नोंदविण्यात आलेल्या तापमानात कर्जत येथे सर्वाधिक ४२.६°C तापमानाची नोंद झाली. तर नेरळ येथे ४२.४°C तापमान नोंदवले गेले. त्यापाठोपाठ पळावा येथे ४२°C तापमान नोंदले गेले.

कल्याण येथे ४१.५°C, डोंबिवली येथे ४१.३°C, बदलापूर येथे ४१.४°C आणि अंबरनाथ येथे ४१.८°C तापमानाची नोंद झाली.
तसेच तळोजा येथे ४१.६°C, मोर्बे येथे ४१.७°C आणि चिपळूण येथे ४१.२°C तापमान नोंदवले गेले.

उष्णतेच्या लाटेचे संकेत
हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांच्या मते, किनारपट्टी भागात तापमान ३८.५°C च्या पुढे गेल्यास ‘हीटवेव्ह’सदृश परिस्थिती मानली जाते. तर घाट परिसरालगतच्या अंतर्गत भागात ४०°C पेक्षा जास्त तापमान हे उष्णतेच्या लाटेचे संकेत मानले जातात. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कर्जत, नेरळ आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना पुढील काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे —

दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे
भरपूर पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करावे
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी

बाहेर पडताना डोके झाकूनच जावे
उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे एसी, कूलर आणि पंख्यांच्या वापरात मोठी वाढ झाली असून नागरिक उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. आगामी काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

शहरनिहाय आजचे तापमान
कर्जत-४२.६°C
कल्याण- ४१.५°C
डोंबिवली-४१.३°
बदलापूर ४१.४°C
नेरळ-४२.४°C
पळावा-४२°C
अंबरनाथ ४१.८°C
मोर्बे-४१.७°C
तळोजा-४१.६°C
चिपळूण ४१.२°C
मुंब्रा-४०.९°C
खारघर-४०.८°C
पनवेल-४०.२°C
मनोर-४०°C
दिघा-३९.९°C
कळवा-३९.८°C
कोपरखैरणे ३९.४°C
ऐरोली-३९.३°C
ठाणे-३९°C
नवी मुंबई विमानतळ ३८.८°C
मुलुंड-३८.२°C
कांजूरमार्ग व बेलापूर ३८°C
वाशी व नेरुळ ३७.९°C

Share.
Leave A Reply

Exit mobile version