Spread the love

भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १४ मे रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा

पिंपरी-चिंचवड : भक्ती शक्ती उद्यान येथील देशातील उंच राष्ट्रध्वज तिरंगा फाटल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवली असल्याची माहिती दिली.

निगडीतील भक्ती शक्ती उद्यानात सन २०१८ मध्ये महापालिकेच्या वतीने भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला होता. या तिरंग्याच्या देखभाल व नियमित ध्वजारोहणासाठी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत दरवर्षी तब्बल ४६ लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याचा आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे. मात्र एवढा मोठा निधी खर्च करूनही राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

“राष्ट्रध्वजाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संबंधित ठेकेदाराने जाणूनबुजून दुर्लक्ष केले असून महापालिका प्रशासन देखील जबाबदार आहे,” असा आरोप काळभोर यांनी केला. तसेच या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि संबंधित ठेकेदारांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी निगडी पोलिसांकडे केली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने १४ मे २०२६ रोजी भक्ती शक्ती उद्यानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. “या आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील,” असेही काळभोर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रध्वजासारख्या राष्ट्रीय अस्मितेच्या प्रतीकाच्या देखभालीत झालेल्या कथित हलगर्जीमुळे नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version