Spread the love

‘अनिकेत चव्हाण यूथ इनिशिएटिव्ह’चा उपक्रम; तज्ज्ञांनी दिले भविष्यवेधी मार्गदर्शन

पुणे (शंकर जोग) : आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मिळावी, त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना भविष्याचा मार्ग सापडावा या उद्देशाने ‘अनिकेत चव्हाण यूथ इनिशिएटिव्ह’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘करिअर डिस्कव्हरी समिट २०२६’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या संकुलात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे संचालक अनिकेत सोपान (काका) चव्हाण यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना बदलत्या करिअर संधी, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील रोजगार क्षेत्रांबाबत सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी बापूसाहेब गायकवाड, ऋषी हराळ, अनूप कुमार, रमा काळे, रावसाहेब घुगे आणि विजय नवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत करिअर क्षेत्रातील वास्तव परिस्थिती आणि नव्या संधींबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

कार्यक्रमात बोलताना अनिकेत चव्हाण म्हणाले, “आज अनेक विद्यार्थी आणि पालक करिअरच्या बाबतीत संभ्रमात असतात. पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्तही अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी स्वतःची क्षमता ओळखून यशस्वी वाटचाल करू शकतात. हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”

तसेच त्यांनी ‘यात्रा शिक्षणविश्वाची’ या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदल समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. युवकांना सक्षम, जागरूक आणि स्वावलंबी बनवण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा मार्गदर्शन कार्यक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version