३८ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी १५ लाखांची मागणी; एसीबीच्या धडक कारवाईने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ
जळगाव (जगदीश सपकाळे) : जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सब-कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी जळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक १४, विनोबा नगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे ३८ लाख ४९ हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी सुरुवातीला तब्बल १८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम १५ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यामध्ये स्वतःसाठी ७ लाख ५० हजार रुपये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ७ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये ९ मे रोजी देण्याचे ठरले होते.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात सापळा रचला. आरोपी योगेश अहिरे यांनी त्यांच्या निळ्या रंगाच्या बलेनो कारमध्ये (MH-19/CV-2619) बसून ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा आवतारे आणि त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ मे २०२६ पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.
