Spread the love

सोशल मीडियावरील ओळख झाली प्रेमात; विनाविसा भारतात राहत असल्याने गुन्हा दाखल

जळगाव  : जळगाव शहरात सोशल मीडियातून जुळलेल्या प्रेमसंबंधामुळे बांगलादेशातून थेट भारतात आलेल्या तरुणीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विनाविसा आणि वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले असून तिला आश्रय देणाऱ्या युवकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला बेकायदेशीररीत्या राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात छापा टाकला असता २० वर्षीय कोणीका राणी शामलचंद्र राय ही तरुणी आढळून आली. तपासादरम्यान तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा अधिकृत प्रवास कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ती बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्याचे उघड झाले असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कोणीका राणी आणि जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला यांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. सोशल मीडियावरील मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि त्यानंतर लग्न करण्याच्या उद्देशाने कोणीका हिने बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात इमिग्रेशन कायदा तसेच परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोणीका आणि चिन्मय यांनी विवाह केल्याचा दावा केला असला तरी त्यासंदर्भातील कोणताही अधिकृत पुरावा अद्याप पोलिसांसमोर सादर करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी साजिद मन्सुरी करत आहेत. सोशल मीडियातून निर्माण होणारे संबंध, त्यातून वाढणारे संपर्क आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण होणारे प्रश्न यावरून या घटनेनंतर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version