Spread the love

सडावणजवळ लोखंडी पट्टीने हल्ला; अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर : भरधाव टँकर सावकाश चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून चौघांनी दोन सख्ख्या भावांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमळनेर-पारोळा मार्गावरील सडावण गावाजवळ घडली. लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघे गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज शंकर मोरे (रा. शांताबाई नगर, अमळनेर) हे आयशर वाहनातून शिरसमणी (ता. पारोळा) येथे जात होते. सडावण येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ अचानक रस्त्यावर पाणी मारणारा टँकर समोर आल्याने वाहन चालकाला अचानक ब्रेक मारावा लागला. त्यामुळे मोठा अपघात टळला.

या प्रकारानंतर युवराज मोरे यांनी संबंधित टँकर चालकाला वाहन हळू चालवण्याची सूचना केली. मात्र, याच कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर टँकर चालकासह मुकेश संजय ठाकरे, संजय रुपचंद ठाकरे व अमोल नाना पाटील (रा. खोकरपाट, ता. अमळनेर) यांनी युवराज मोरे व त्यांचे भाऊ सुरेश मोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.

वाद वाढल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांसह काठीला बसविलेल्या लोखंडी पट्टीने दोघांच्या डोक्यावर वार केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी युवराज मोरे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version