महावितरण कार्यालयावर नागरिकांचा संताप; तातडीने उपाययोजनांची मागणी
कल्याण : खडवली आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीज पुरवठा खंडितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शंभूदुर्ग संघटनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढला. या वेळी महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शंभूदुर्ग संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सागर मोरे, राज्य संघटक संजय पाटील, महिला अध्यक्षा जयवंती लोणे आणि उपजिल्हा अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. खडवली महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता योगेश चेंदवनकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात वीज पुरवठा तातडीने सुरळीत करणे, जुनी व नादुरुस्त वीजवाहिनी बदलणे, विजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवताना योग्य जागेची निवड करणे, तसेच जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याची मागणी करण्यात आली. परिसरातील विविध तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
महिला अध्यक्षा जयवंती लोणे यांनी सांगितले की, “वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून व्यापारी वर्ग, लहान उद्योग तसेच रुग्णालयीन सेवांनाही फटका बसत आहे. नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.”
दरम्यान, महावितरणचे कनिष्ठ अभियंता योगेश चेंदवनकर यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. “लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. परिसरात दोन नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम प्रस्तावित असून विजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात शंभूदुर्ग संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी, रिक्षा संघटना, मेडिकल असोसिएशनचे सदस्य तसेच खडवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
