माध्यमिक शिक्षक संघटना आक्रमक; शिक्षणाधिकाऱ्यांकडून दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन
एरंडोल (करण शिंदे) : जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांचे रखडलेले वेतन अखेर मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर करत तातडीने वेतन अदा करण्याची मागणी केली.
शालार्थ प्रक्रियेमधील त्रुटींमुळे अनेक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडले असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने वेतन पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिक्षकांवर विमा, पतसंस्था, बँक कर्जाचे हप्ते तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असल्याने वेतन रखडल्यामुळे आर्थिक आणि मानसिक तणाव वाढल्याचे समितीने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीही दूरध्वनीद्वारे शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वेतन तातडीने अदा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सकारात्मक भूमिका घेत वेतन अधीक्षकांशी तातडीने चर्चा केली. “पुढील दोन दिवसांत आवश्यक त्रुटींची पूर्तता करून वेतन देयकाचा मार्ग मोकळा करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, समन्वयक तथा जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये करण्याची मागणी केली. या मागणीला शिक्षण विभागाने तत्काळ मान्यता दिली. पुढील महिन्यापासून सर्व मुख्याध्यापकांना वेतन बिले वेळेत आणि त्रुटीविरहित सादर करण्याच्या सक्त सूचना देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, कार्याध्यक्ष पी. ए. पाटील, डॉ. मिलिंद बागुल, संतोष कचरे, डॉ. बी. डी. शिरसाठ, महेंद्र पवार, गोविंदा पाटील, सुरेश अहिरे, सुनील वानखेडे, दिनेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
“शिक्षकांना जनगणना, बीएलओ आणि विविध प्रशासकीय कामांचा ताण असताना हक्काचे वेतन वेळेवर न मिळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी भावना समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी व्यक्त केली.
सध्या शिक्षक शिक्षकेतरांना एक प्रशासनाकडून जनगणना तसेच बीएलओ च्या माध्यमातून एस आय आर चे काम आणि दुसरीकडे हक्काचे वेतन वेळेवर मिळत नसल्याने प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींना त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी अशा प्रकारे वारंवार निवेदन देणे व त्या माध्यमातून प्रशासनासोबत संघर्ष करणं हे अतिशय दुःखद आहे.
– श्री तुळशीराम सोनवणे,
समन्वयक माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा.
