Spread the love

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे केळीबागा मोठ्या नुकसानीपासून बचावल्या

वरणगाव : भुसावळ तालुक्यातील विल्हाळे शिवारात सोमवारी दुपारी अचानक झाडाझुडपांना आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विल्हाळे तलावाकडे जाणाऱ्या नाल्यालगत लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने जवळील केळीबागांना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र वरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली.

सोमवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उन्हाची तीव्रता आणि परिसरातील कोरडी झुडपे व गवत यामुळे आग झपाट्याने पसरू लागली. आगीच्या ज्वाळा वाढत असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग थेट शेतीपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरणगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाण्याचा जोरदार मारा करत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात झाडाझुडपे आणि कोरडे गवत जळून खाक झाले. सुदैवाने जवळील केळीबागा मोठ्या नुकसानीपासून वाचल्या. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढती उष्णता आणि कोरडे गवत यामुळे अशा प्रकारच्या आगीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version