Spread the love

हायवे हॉटेलमागे पोलिसांचा छापा; तब्बल ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

पारोळा (सुरेश पाटोळे) : पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत रसायनयुक्त पदार्थांची अवैधरित्या साठवणूक केल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रामदेव राजस्थानी चौधरी हायवे हॉटेलच्या मागील बाजूस झाडाझुडपांमध्ये असुरक्षितरीत्या रसायनयुक्त पदार्थांचा साठा आढळून आल्याने सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसवे शिवारातील आरोपी दिनेश पाटील यांच्या मालकीच्या हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला कोणताही शासकीय परवाना नसताना रसायनयुक्त पदार्थ साठवून ठेवण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत हे रसायन ‘सोडियम बाय सल्फाईड लिक्विड’ असल्याचे समोर आले असून ते काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या ठिकाणी रसायनांचा साठा अत्यंत असुरक्षित पद्धतीने करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. माहिती मिळताच पारोळा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळी छापा टाकला. छाप्यात पांढऱ्या रंगाचे रसायनयुक्त टँकर, लोखंडी पत्र्याजवळ ठेवलेले अर्धवट भरलेले टँकर, निळ्या रंगाच्या टाक्या तसेच इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे टाटा कंपनीचे बारा चाकी टँकर, ९१ हजार रुपये किमतीचे रासायनिक पदार्थाने भरलेले अर्धवट टँकर, २ लाख ४ हजार ७५० रुपयांच्या रासायनिक पदार्थ भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाक्या, १ लाख ३६ हजार ५०० रुपये किमतीचे जुने टँकर, १५ निळ्या रंगाच्या टाक्या, मोटारसायकल, मोबाईल, रिकामे टँकर आणि इलेक्ट्रिक मोटारचा समावेश आहे. या प्रकरणी पुरवठा अधिकारी शिवकुमार निरगुडे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोउपनिरीक्षक योगेश महाजन, अमोल दुकळे, हवालदार डॉ. शरद पाटील, महेश पाटील, संदीप सातपुते, संजय पाटील तसेच कॉन्स्टेबल आशिष गायकवाड, भूषण पाटील आणि मयूर पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version