Spread the love

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘मिनी फायटर’ अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण

धरणगाव : धरणगाव शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अत्याधुनिक ‘मिनी फायटर’ अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत धरणगाव नगरपरिषदेला हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्यातील ५४ नगरपरिषदांना अग्निशमन व रेस्क्यू वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून धरणगाव शहराला ही अत्याधुनिक सुविधा मिळाली आहे. शहरातील वाढते नागरीकरण, अरुंद रस्ते आणि गल्लीबोळ लक्षात घेता हे वाहन आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

अरुंद गल्लीबोळांतही पोहोचणार मदत
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “धरणगाव शहरातील अनेक भागांत मोठ्या अग्निशमन गाड्यांना पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र ही मिनी फायटर गाडी आता शहरातील कोणत्याही भागात सहज पोहोचून आग विझवण्याचे काम जलद गतीने करू शकणार आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी हे वाहन महत्त्वाची भूमिका बजावेल.”

ते पुढे म्हणाले की, “ही गाडी केवळ आग विझवण्यासाठीच नव्हे तर पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती, रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यामध्येही प्रभावीपणे उपयोगात आणली जाईल. शासन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून स्थानिक स्वराज्य संस्थांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.”

आधुनिक सुविधांनी सज्ज वाहन
या अत्याधुनिक मिनी फायटर वाहनामध्ये अग्निशमन साहित्य, बचाव उपकरणे तसेच विविध आपत्कालीन सेवा साधनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे धरणगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाची कार्यक्षमता अधिक सक्षम होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यास या वाहनाची मोठी मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, लोकार्पणानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः वाहनात बसून त्याची पाहणी केली व त्यातील आधुनिक सुविधांची माहिती जाणून घेतली.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन, आरोग्य सभापती नितीन बयस, शहर प्रमुख वीरेंद्र पूर्वे, विलास महाजन, पप्पू भावे, अंजली विसावे, कविता पाटील, मंदाकिनी येवले, प्रियंका जाधव, भारती महाजन, लक्ष्मण महाजन, परमेश्वर महाजन, सुनील चौधरी, नीलेश चौधरी, विजय महाजन, बुटा पाटील, रवी महाजन, बाळू जाधव, तौसीफ पटेल, गोविंदा धनगर, पप्पू कंखरे, हेमंत चौधरी, कडू आप्पा, सद्दाम अली, इब्राहिम हाजी, सुदर्शन भागवत, अहमद पठाण, प्रथमेश चौधरी, कल्पेश विसावे, गुलाब मराठे, चेतन जाधव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version