८९ हजारांचा मुद्देमाल जप्त; मुख्य आरोपी फरार, पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह
पाचोरा : पाचोरा शहरातील रामानंद नगर परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकत तब्बल ८९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईदरम्यान एकही संशयित पोलिसांच्या हाती न लागल्याने संपूर्ण प्रकरणाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्य आरोपीसह इतर साथीदार घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर भागातील एका बंद पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ऑनलाइन कल्याण मटका सुरू असल्याची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ८९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ४० हजार रुपये किमतीचे चार प्रिंटर, ३० हजार ५०० रुपये किमतीचे ६१ मोबाईल संच, तसेच प्रिंटर, कॅल्क्युलेटर, पेन, नोटबुक आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सुनील देवराम भोई याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पाचोऱ्यातील संतोष पाटील हा मोबाईल फोनच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्यासाठी ऑनलाइन मटका जुगार चालवत असल्याचे समोर आले होते.
पोलिस येण्यापूर्वीच आरोपी पसार?
पोलिसांनी छापा टाकला असता जुगाराचे साहित्य घटनास्थळी मिळाले, मात्र तेथे कार्यरत असलेले कर्मचारी आणि मुख्य आरोपी पसार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची माहिती आधीच आरोपींपर्यंत पोहोचली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांमध्ये “मटका अड्ड्यावर छापा पडण्यापूर्वीच आरोपींना खबर कोणी दिली?” याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच जप्त केलेल्या मुद्देमालातील काही महत्त्वाचे साहित्य पुन्हा मटका चालविणाऱ्यांकडे परत दिल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष पाटील व इतर साथीदारांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अवैध धंद्यांवर नियंत्रणाची मागणी
दरम्यान, पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अनेक वेळा तक्रारी होऊनही मटका, जुगार आणि इतर अवैध व्यवसाय थांबत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाचोरा शहर व परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
