भोंदू भगतसह त्याच्या साथीदाराला अटक, किन्नर समाज रस्त्यावर, नराधमाला फाशीच्या शिक्षेची मागणी…..
धुळे (सुनील निकम) : धुळ्यात अध्यात्माच्या नावाखाली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे वर्षभर शारीरिक शोषण करणाऱ्या नराधम 1) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते रा. कदमबांडे नगर देवपूर धुळे, या भोंदू भगतसह त्याच्या साथीदारा विरोधात पश्चिम देवपूर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच भोंदू भगतसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहे. धुळ्यात घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे अध्यात्माच्या आड विकृत चाळे करणाऱ्या भोंदू भगतचा पर्दाफाश झाला आहे. घडलेल्या या घटनेमुळे किन्नर समाज रस्त्यावर उतरत नराधमासह त्याच्या साथीदाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
अश्लील चित्रफित तयार करत अल्पवयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार
तेरा वर्षीय अल्पवयीन पीडित तरुणी वर्षभरापूर्वी मसाल्याची पुडी देण्यासाठी भोंदू भगतच्या घरी गेली होती. यावेळी भोंदू भगतने त्या तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. केलेल्या संबंधाची अश्लील चित्रफित तयार करून त्या चित्रफित च्या माध्यमातून वर्षभर अल्पवयीन पीडित तरुणीवर भोंदू भगतसह त्याच्या साथीदाराकडून वारंवार शारीरिक शोषण करण्यात आलं. अखेर अल्पवयीन तरुणीच्या आजीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे.
आजीच्या सतर्कतेमुळे भोंदू भगतचा पर्दाफाश….
गेल्या वर्षभरापासून भोंदू भगतसह त्याच्या साथीदाराकडून होत असलेल्या शारीरिक शोषणामुळे अल्पवयीन तरुणी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाली होती. नुकत्याच गावावरून आलेल्या आजीने तरुणीची अस्वस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तरुणीला विश्वासात घेतल्याने अल्पवयीन तरुणीने आजीकडे संपूर्ण घटनेच कथन केल्याने अखेर आजीने पीडित अल्पवयीन तरुणीसह पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत भोंदू भगतसह त्याच्या साथीदारा विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत दोघांना गजाआड केले आहे.
घटनेमुळे धुळ्यात संताप, किन्नर समाज रस्त्यावर नराधमाला फाशीची केली मागणी….
अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारानंतर धुळ्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे. या घटनेच्या विरोधात किन्नर समाजाने रस्त्यावर उतरत घटनेचा निषेध नोंदवला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून नराधम भोंदू भगतसह त्याच्या साथीदाराला फाशीच्या शिक्षा देण्यात यावी अशी मागणी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी केली आहे.
नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाच प्रकरण ताजा असतानाच धुळ्यात देखील भोंदू भगत ने अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या नराधमा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी समोर आली आहे.
प्रतिक्रिया
धुळे शहरात घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. स्वतःला तृतीयपंथी तसेच “भगत” म्हणवून घेणाऱ्या भोंदू व्यक्तीने केलेले कृत्य अत्यंत संतापजनक आहे. आज एका निष्पाप मुलीसोबत ही घटना घडली, उद्या अशाच प्रकारे इतरांनाही बळी जावे लागू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे. शहरात अनेक भोंदू लोक “आमच्यात माता येते” असे सांगून भोळ्या जनतेची फसवणूक करत आहेत. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली लोकांची मानसिक व आर्थिक लूट सुरू असून अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. विशेष म्हणजे, असे लोक तृतीयपंथी समाजाचीही बदनामी करत आहेत. त्यांचा आमच्या समाजाशी किंवा कोणत्याही धार्मिक मठाशी संबंध नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह संबंधित सर्व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. राज्यात महिलांवरील आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने सरकारने भोंदूगिरीविरोधात कठोर कायदे आणि प्रभावी कारवाई करावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
– पार्वती जोगी – महामंडलेश्वर, किन्नर आखाडा धुळे
