Spread the love

माहिंदळे ग्रामस्थांचे तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू

जल जीवन मिशनच्या निकृष्ट कामाचा आरोप; तीव्र जलटंचाईने संतप्त ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाला दिला इशारा

भडगाव : भडगाव तालुक्यातील मौजे माहिंदळे गावात जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. गावातील भीषण पाणीटंचाई, वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून भडगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

देविदास पाटील, पृथ्वीराज पाटील, राजेंद्र पाटील आणि सुनील पाटील यांनी उपोषणाला बसत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “जल जीवन मिशनसारखी महत्त्वाकांक्षी योजना गावात आली खरी, पण निकृष्ट कामांमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे,” असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेली पाइपलाइन निकृष्ट दर्जाची असून विविध तांत्रिक त्रुटींमुळे गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. अनेकदा पाणीपुरवठा अचानक बंद पडतो, तर काही भागांमध्ये पाणीच पोहोचत नसल्याची तक्रार आहे. परिणामी महिलांसह ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून उन्हाळ्याच्या झळांमध्ये नागरिकांचे हाल होत आहेत.

या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी २० एप्रिल २०२६ रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागांकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रशासनाने आठ दिवसांत दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला आहे.

“आश्वासनांचा कंटाळा आला आहे, आता कायमस्वरूपी तोडगा हवा,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गावाला तातडीने नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान, या आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून तहसील कार्यालय परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महिलांनीही आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाने प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये पाण्यासाठी सुरू झालेल्या या लढ्यामुळे प्रशासनाची कसोटी लागली असून, आता प्रशासन या प्रश्नावर कितपत गंभीरपणे निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version