Spread the love

मुलीचे लग्न पार पाडून आनंदात घरी परतलेल्या दांपत्यावर काळाचा घाला

संतप्त नागरिकांनी आरोपी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

धुळे  शिरपूर (सूनील निकम) :  धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एका सख्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या भीषण प्रकाराने मानवी नात्यांनाच काळीमा फासला असून, ज्या घरात काही तासांपूर्वी मुलीच्या लग्नाचा आनंद होता, त्याच घरात काही क्षणांत शोककळा पसरली.

मृत दांपत्याची नावे इंदाराम आणि रंजू देवी अशी असून, त्यांनी नुकतेच आपल्या मुलीचे लग्न पार पाडले होते. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते आनंदाने घरी परतले होते. मात्र, घरी आल्यानंतर किरकोळ कारणावरून आई-वडिलांनी मुलाला त्याच्या पत्नीसमोर सुनावल्याचे सांगितले जात आहे. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित मुलगा संतापाच्या भरात हिंसक बनला.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने घरात ठेवलेले मुसळ उचलून आई-वडिलांच्या डोक्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातून येणारा आरडाओरडा ऐकून शेजारी आणि परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले. संतप्त नागरिकांनी आरोपीला शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शिरपूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, “पत्नीसमोर रागावल्याच्या कारणावरून मुलानेच आई-वडिलांचा जीव घेणे” ही बाब नागरिकांना सुन्न करणारी ठरली आहे. परिसरातील नागरिकांकडून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

आरोपिला पोलिसांनी घेतले ताब्यात…
विशेष म्हणजे, ज्या घरात काही वेळापूर्वीच मुलीच्या लग्नानंतर आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात अचानक मृत्यूचे सावट पसरल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.दरम्यान, शिरपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version