Spread the love

हेल्पलाईन, बीट मार्शल भेटी आणि तातडीच्या मदतीबाबत जनजागृती कार्यक्रम

चोपडा : चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा येथे पार पडला. कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना, हेल्पलाईन सेवा तसेच आपत्कालीन परिस्थितीत मिळणाऱ्या तातडीच्या मदतीची माहिती देण्यात आली.

यावेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास तातडीने डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.

पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, ज्येष्ठ नागरिकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्याऐवजी पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन आवश्यक ती मदत करतील. तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल हे नोंदणीकृत एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी नियमित भेट देऊन त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करतील.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांना अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देणे, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मदतीसाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांकही ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.

पोलीस निरीक्षक पवन देसले यांची कार्यशैली चर्चेत
दरम्यान, तालुका पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी नुकताच कार्यभार स्वीकारल्यानंतर चोपडा शहर व तालुक्यात शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा पोलिसांमार्फत कशा उपलब्ध करून देता येतील, याकडे ते जातीने लक्ष देत आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सेवा बजावताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून, चोपडा शहरातही विविध जनहिताचे उपक्रम राबवून प्रभावी कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version