Spread the love

आर्वी गावावर शोककळा; कुटुंबाचा आधार हरपला

धुळे (सुनील निकम) : धुळे तालुक्यातील आर्वी येथे शेतात काम करत असताना विहिरीत पडून शेतकरी पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊसाहेब निंबा माळी (वय ४३) आणि योगेश भाऊसाहेब माळी (वय १७) अशी मृत पिता-पुत्रांची नावे आहेत. दोघेही शेतात कामासाठी गेले होते.

दुपारच्या सुमारास जेवणाचा डबा घेऊन शेतात गेलेल्या भाऊसाहेब माळी यांच्या पत्नीला पिता-पुत्र दोघेही शेतात दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेतातील विहिरीत दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. हे दृश्य पाहताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी विहिरीजवळ मोठी गर्दी केली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

गावातील तरुण शेतकरी आणि कुटुंबातील कर्त्या पुरुषांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आर्वी गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version