Spread the love

बुवाबाजीच्या संशयातून तरुण व विवाहितेची हत्या?; भोंदू भगत पोलिसांच्या ताब्यात

धुळे (सुनील निकम) : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, तरुण आणि विवाहित तरुणीचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमागे बुवाबाजीचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, निजामपूर पोलिसांनी संशयित भोंदू भगत योगेश खैरनार याला ताब्यात घेतले आहे. मृतांमध्ये जयश्री रजनीकांत काकुसते (वय २५, रा. कासारे, ता. साक्री) आणि अक्षय सोनवणे (वय २८, रा. भाडणे, ता. साक्री) यांचा समावेश आहे.

दोन ठिकाणी मृतदेह आढळल्याने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास वरदाने टेंबे फाट्याजवळ जयश्री काकुसते हिचा मृतदेह दुचाकीसह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तर दुसरीकडे अक्षय सोनवणे याचा मृतदेह उभरांडी-जैताणे शिवारातील गौशाळेच्या मठाजवळ पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही घटनांची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

भोंदू भगताच्या मठातील वादातून हत्या?
दरम्यान, भोंदू भगत योगेश खैरनार यांच्या मठात झालेल्या वादातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. विशेष म्हणजे, मृत विवाहितेच्या मृतदेहाजवळ संशयित भोंदू भगताचा रुमाल आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. त्यानंतर पोलिसांनी योगेश खैरनार याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांचा कसून तपास सुरू
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी निजामपूर पोलिसांसह फॉरेन्सिक लॅब, श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली. बुवाबाजीच्या आहारी गेल्यामुळे हे दुहेरी हत्याकांड घडले की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

२४ तासांत चार हत्यांनी धुळे हादरले
यापूर्वी शिरपूर येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर आता साक्रीतील या घटनेमुळे अवघ्या २४ तासांत चार जणांचा बळी गेल्याने धुळे जिल्हा हादरला असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version