भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक; एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी
एरंडोल (करण शिंदे) : एरंडोल-कासोदा मार्गावरील खडके फाट्याजवळ आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील भडगाव-धरणगाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ एमएच ६९९७ क्रमांकाची भडगाव-धरणगाव बस कासोदा येथून एरंडोलकडे येत असताना खडके फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एमएच १९ ईटी ४३३९ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात दुचाकीस्वार, त्यांची पत्नी तसेच दोन लहान मुले जखमी झाली असून, जखमी पावरा कुटुंब हे आडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून तातडीने खाजगी वाहनाद्वारे पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, एरंडोल-कासोदा मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वेगमर्यादा नियंत्रण, वाहतूक संकेत आणि सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
