Spread the love

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिले मोठे स्पष्टीकरण

नवी दिल्ली :  जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य तणावामुळे अनेक देशांमध्ये कडक निर्बंध आणि लॉकडाऊनसदृश्य उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतातही पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लॉकडाऊनचा विषय निघताच नागरिकांमध्ये चिंता वाढताना दिसत आहे.

दरम्यान, या चर्चांवर आता केंद्र सरकारकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी भारतातील परिस्थितीबाबत भाष्य करत लॉकडाऊनच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

“भारतात सध्या लॉकडाऊनची गरज नाही”
भारतामध्ये लॉकडाऊन लागणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना किरेन रिजिजू म्हणाले की, “सध्या भारतातील परिस्थिती इतकी गंभीर नाही की लॉकडाऊनसारखी कठोर पावले उचलावी लागतील. मात्र, भविष्यातील कोणत्याही वाईट परिस्थितीसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.” रिजिजू यांच्या या वक्तव्यामुळे केंद्र सरकार सध्या तरी देशात लॉकडाऊन लावण्याच्या विचारात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

“भारत गंभीर संकटात नाही”
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्लाही दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना रिजिजू यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “भारतामध्ये सध्या गंभीर संकटाची परिस्थिती नाही. मात्र पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम व्यापार मार्गांवरही होत आहे.”

ते पुढे म्हणाले की, “भारताने कोणताही तणाव निर्माण केलेला नाही. पण जागतिक परिस्थितीचा परिणाम आपल्यावर होत आहे. त्यामुळे देशाने स्वतःच्या पातळीवर तयारी ठेवणे गरजेचे आहे.”

देशांतर्गत उत्पादनावर सरकारचा भर
किरण रिजिजू यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे.

“भारत हा अजूनही जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. त्यामुळे जागतिक संकटाच्या काळात ऊर्जा बचत आणि स्वयंपूर्णतेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. सध्यातरी भारतात लॉकडाऊनची शक्यता नसली, तरी जागतिक परिस्थिती पाहता सतर्कता आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version